रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

मा. आर्किटेक्ट विजय सुतार साहेब,मुंबई (मूळ गाव चंदगड,कोल्हापूर)यांचा सुतार व्यवसाय संदर्भातील अभ्यासपूर्ण लेख#आर्किटेक्चरटेल्स@IKEA@_सुतार !!


IKEA म्हणजे ईकी, इकिआ किंवा आयकीया काहीही म्हणा, सर्व प्रकारचे फर्निचर बनविणाऱ्या या जगांतील सर्वात मोठ्या स्वीडिश कंपनीने काल भारतांतील आपले पहिलेवहिले शोरूम हैदराबाद या तुमची स्वप्नं गोंजारणाऱ्या हायटेक शहरांत उघडले आहे. तब्बल तेरा एकर जागेत चार लाख स्क्वेअर फूट डिस्प्ले एरिया अन जवळपास साडेसात हजार उत्पादने एकाच छतांखाली उपलब्ध असणारी ही शोरूम म्हणजे एक फर्निचरनगरीच असणार आहे. एकट्या हैदराबाद शहरांतील या शोरूमला वर्षाकाठी सुमारे साठ लाख लोक भेट देतील असा कंपनीचा दावा आहे. या अवाढव्य शोरूममध्ये अगदी शंभर रुपयांपासून सुरुवात होणारे अन आधुनिक फर्निचरची निकड असलेले शो पीस, कटलरी अन टॉईजदेखील मिळणार आहेत. या भव्य शोरूमसोबत भारतांतील सर्वात मोठे तब्बल एक हजार लोक एकाच वेळी बसू शकतील इतकं भव्य रेस्टॉरंट सुद्धा असणार आहे की जिथे अस्सल भारतीय चवीची बिर्याणी, दालफ्राय, समोसा, इडलीसोबत स्वीडिश अन आंतरराष्ट्रीय व्यंजनेसुद्धा मिळणार आहेत.

खरंतर कंपनीने २००६ मध्येच भारतांत येण्याचा प्रयत्न केला होता पण आपल्याकडील थेट परकीय गुंतवणूकीसाठी आवश्यक असलेला स्थानिक व्यापारी कंपनीसोबत कराव्या लागणाऱ्या भागीदारीचा त्यावेळचा नियम त्यांना रुचला न्हवता. या बारा वर्षांत कंपनीने संपूर्ण भारतीय बाजारपेठ अन भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास अन त्यांवर संशोधन केलेलं आहे. अत्याधुनिक साहित्यांबरोबरच अगदी पारंपरिक भारतीय स्वयंपाकघरांतील मसाल्याचे डबे कसे असावे, इडलीवडा शिजवण्यासाठी काय काय भांडी लागणार आहेत, पोळ्या लाटण्यासाठी लागणारं पोळपाट लाटणं ते भजीसमोसा बनण्यातळण्यासाठी लागणारी आयुधं सर्वकाही यांच्याकडे मिळणार आहे. आता ते तब्बल एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक भारतांत करताहेत, त्यांची दुसरी शोरुम मुंबईमध्ये २०१९ मध्ये उघडते आहे आणि २०२५ पर्यंत भारतांतील प्रमुख शहरांत एकूण पंचवीस शोरूम असणार आहेत. पंचवीस हजार स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा कंपनीचा मानस आहे ज्यापैकी अर्ध्याहून अधिक महिला असणार आहेत.
तर मी नंतरचा आर्किटेक्ट पण मूळचा पारंपरिक अन स्वतः सुतारकाम करणारा सुतार, ही कथा सांगण्याचा माझा उद्देश वेगळाच आहे. इथे आयकीयामध्ये फर्निचर खरेदी करतांना कंपनी Do it yourself अशी एक सुविधा देणार आहे की ज्याद्वारे तुम्ही खरेदी करत असलेलं फर्निचर बनवतांना त्यात तुमचाही सहभाग असणार आहे. खरंतर ग्राहकांना खुश करण्याचा हा बिझनेस फंडा आहे अन तो कॅच करणे हाच तर खरा बिझनेस असतो. कंपनीनियुक्त सुतार तुम्हांला सोबत घेणार अन आधीच तयार असलेले सुटे भाग एकत्र करुन तुमचं कपाट तुमच्यासमोर जोडून तयार होणार म्हणजे थोडक्यांत आपण नेहमीच्या वडापावच्या गाडीवर उभं राहून आजची खास निवड म्हणून जशी गरमागरम कांदाभजी बनवून घेतो तसाच हा प्रकार आहे. आता कंपनी काही निष्णात सुतारांना घसघशीत मोबदला देऊन कामांवर ठेवून घेईलही अन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली म्हणून माझे जातबांधव जल्लोषही साजरा करतील, करुद्यात. मला या सगळ्यांत तो हत्यारांची पिशवी पाठीवर मारुन इमानइतबारे काम करणारा सुतार दिसतो आहे. सोबत जाणवत आहेत ते तो देत असलेले मरणासन्न आचके अन आधीच भिंतीवर टांगलेली, कधीकाळी बलुतेदार म्हणून राजाश्रय मिळून प्रसिद्धी पावलेली ती सुतार या व्यवसायाची प्रतिमा की जी प्रतिमा हे लिहिण्यास उद्युक्त करत आहे.

आता आधीच गुणवत्तेची वानवा असलेल्या आपल्या भारतीय फर्निचर बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा अन मारामारीदेखील आहे. प्रत्येक शहरी गोदरेज,ड्यूरियन सारखे ब्रँड काही प्रमाणांत गुणवत्ता राखून आहेत तर काही चायनीज, मलेशियन तकलादू निनावी ब्रँड आहेत, शिवाय लोकल उत्पादक अन एकदाच भेटणारे कॉन्ट्रॅक्टर तर पावलांपावलांवर आहेत. आता यात काही ठिकाणी तुम्हांला क्वालिटी मिळू शकेलही पण आयुष्यभर टिकणारं फर्निचर अन ते बनविणारा सुतार तुम्हांला अजिबात भेटणार नाही. कदाचित बदलत्या काळांबरोबर चालणाऱ्यांना आयुष्यभर टिकणाऱ्या फर्निचरची आवश्यकता नसणार आहे पण अल्पजीवी फर्निचर बनवतांना काही पळवाटा शोधाव्या लागतात अन हे असं करणं म्हणजे आपली या व्यवसायांप्रती असलेली निष्ठा नक्कीच न्हवे. एक सुतार म्हणून मी हा विचार करतो आहे पण असा विचार करुन आजच्या बेगडी जगांत माझं पोट भरत नाहीय हेही कटू सत्य आहे. म्हणूनच कधीकधी वाटतं त्यावेळी पै पै जमवून आर्किटेक्चरची पदवी माझ्या नावापुढे जोडून घेतली ते फार बरं झालं. तेव्हां केवळ बारावीतल्या गुणांमुळे तिथे प्रवेश मिळाला तो जर मिळाला नसता तर मी सुतारकामच करणार होतो अन पैसे भरुन आर्किटेक्चर शिकवण्याची सुतारकाम करणाऱ्या माझ्या वडिलांची ऐपत नक्कीच न्हवती.

माफ करा पण जातीचा उल्लेख करतोच आहे, पूर्वी जो अस्सल कारागीर असलेला जातीवंत सुतार अतिशय मेहनती असलेले हे सुतारकाम करुन आपलं सुतार हे अस्तित्व अबाधित रहाण्यासाठी संघर्ष करत होता अन करतोही आहे तो आता काही वर्षांत धराशायी होणार आहे. खरंतर आपल्या देशाने पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हां मुक्त अर्थव्यवस्थेचा जो अंगीकार केला तेव्हांपासून ही सुरुवात प्रकर्षाने झालेली आहे. सुरुवातीपासून आम्ही सुतार परंपरेने चालत आलेला आमचा हा मेहनती व्यवसाय अत्यंत निष्ठेने करत आलो आहोत पण आजकाल सुतारकाम करणारा हा सुतारच असतो असं अजिबात नाहीय. खूपवेळेस उदरभरण, काहीवेळेस गरज अन मुंबईसारख्या शहरांत मिळणारी भरघोस मजुरी पाहूनच बरेचसे लोक या व्यवसायांत आले अन गुणवत्ता बिघडली. पुढे यांत सवयीप्रमाणे आधी राजस्थानी सुतार, मग उत्तर भारतीय कुणीही आले अन आपल्या सुतार म्हणजे मराठी माणसांच्या टिपिकल अवगुणांमुळे त्यांच्या पोटांवर न्हवे तर नरड्यांवर पाय देऊन उभे राहिले.

एक उदाहरण देईन,एक सागवानी फ्रेमचा लॅमिनेट फिनिश्ड डिझाईनर डबल बेड करण्यासाठी मी साधारण दहा हजार रुपये मजुरी घेईन याच कामाचे कुणी एकजण पाच हजार सांगेल. अर्थातच काम देणारा पाच हजारवाल्याला बोलावेल,पाच हजार घेणारा काम होईपर्यंत तुमच्याशी पॉझिटिव्ह बोलेल, तुम्हांला कुठलीही गॅरंटी देणार नाही अन काही तक्रार आली तर कदाचित तो पुन्हा भेटणारही नाही. मग काम देणाऱ्यांनी ही तक्रार निवारण्यासाठी कितीही विनंती केली तर माझ्या स्वभावबरहुकूम मी जाणार नाही. मग त्याच्यासारखाच तिसरा कुणी तिथे येणार अथवा तो बेड तसाच नादुरुस्त अवस्थेत वापरला जाणार हे सत्य आहे. हे राहुद्यात, महाराष्ट्रातील एका मोठ्या शहरांत रहाणारा माझा एक मित्र तिथला टॉप आर्किटेक्ट आहे त्याने मुंबईत एका मैत्रिणीचे इंटेरिअर्सचे काम सुरु केले. नेहमीच्या साईट व्हिझिटसाठी विनंती करुन त्याने मला तयार केले अन तीन महिन्यांच्या कामांत त्याने दोनच साईट व्हिझिट केल्या. अर्थात माझी टीम वापरुन त्याच्या संकल्पनेतील काम करतांना मला भयंकर त्रास झाला पण मी ते यशस्वी केलं. आम्ही सांगू ती पूर्व दिशा मानणाऱ्या त्या क्लायंट म्हणजे मैत्रिणीकडून कुठलाही हस्तक्षेप अथवा पैशांबाबत कसलीही तक्रार न्हवती पण या कामांदरम्यान मला मित्रांच्या काही सवयी प्रचंड खटकल्या. आधुनिकता, गुणवत्तेत तडजोड करायची नाही हे माझं तत्व पण ते त्याला मान्य न्हवतं म्हणून मैत्रिणीकडून संमती घेऊन मी ऍडव्हान्स दिलेल्या काही ऑर्डर्स त्याने कॅन्सल करावयास लावल्या. मित्र म्हणून ते मी सहन केलं पण माझ्यातल्या सुतारांला ते पटलं नाही अन ते मी मैत्रिणीला बोलून दाखवलं. ती तर माणूस म्हणून सर्वोत्तम होती तिने आम्हां दोघांमध्ये काही अनबन होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.

पन्नास वर्षांपूर्वी मायानगरी मुंबईत एक कसबी,उत्कृष्ट दर्जाचे काम करणारे सुतार म्हणून वडील,काकांनी नावलौकिक, पैसा मिळवला. आता काही खाष्ट सवयींमुळे त्यांचा तो रुबाब टिकला नाही हा भाग वेगळा पण वर मी वर्णिलेल्या बदलांचा फार मोठा फटका या मंडळींना उतारवयात बसला. हा उतारवयाचा काळ म्हणजे तोच मुक्त अर्थव्यवस्थेचा सुरुवातीचा काळ होता. हे लोक जेव्हां एकत्र काम करत तेव्हां तिथे जवळपास पन्नासेक अस्सल मराठमोळे कारागीर सुखाने काम करायचे. अर्थात कामांच्या मानाने यांचे कामाचे दामही तसेच मजबूत असायचे अन विशेष म्हणजे लोकही अत्यंत खुश होऊन ते विनातक्रार देत असत. नंतर ही मुक्त अर्थव्यवस्था या सगळ्यांच्या मुळावर उठली अन गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करणारे हे सगळे लोक देशोधडीला लागले.

म्हणजे थोडक्यांत काय तर तो लाकूड कापतांना, रंधा मारतांना घाम गाळणारा जो सुतार होता तो आता थोड्याच दिवसांत इतिहासजमा होईल. याला जबाबदार घटक म्हणजे तो स्वतः, आपल्याकडील व्यवस्था, व्यवस्थेची मानसिकता, व्यवस्थेची काही गळचेपी धोरणं, आपल्याकडील सटरफटर असलेल्या काही आस्थापना अन आता आलेली ही महाकाय IKEA, अजून पुढे कायकाय ते आता पाहूयांत !!
सुतार ..
विजय !!!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: