गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

समाज जीवन,सामाजिक जाणींव व समाजकार्याची दिशा.

💢 विश्वकर्मीय पांचाळ सुतार समाज 💢

 समाज जीवन,सामाजिक जाणींव व समाजकार्याची दिशा.


सस्नेह नमस्कार, जय श्री प्रभु विश्वकर्मा ! 🙏🏻🙏🏻
 युवा क्रांतीच्या माध्यमातून समाजकारणातील ' कार्यकर्ता ' म्हणून कार्य करण्याची संधी मला मिळाली, यासाठी समाजातील जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन, युवा कार्यकर्त्याची समर्थ साथ व समाजाने दिलेला प्रतिसाद..मी स्वतःला भाग्यवंत समजतो.
 मुळातच माझे वय व समाजकारणातील अल्पसा अनुभव पाहता माझ्याकडून "मार्गदर्शन " व्हावे एवढी ऐपत निश्चितच माझी नाही पण " समाजकार्याची जाणीव, कार्याची प्रेरणा व त्यातून विचारांची निर्मिती " यामुळेच आपणासी ऋणानुबंध घट्ट झाले व त्यायोगे सुसंवाद साधण्याचा माझा प्रयत्न असतो.
 " कार्य म्हणजे भाग्य व नीती म्हणजे माणुस " या सिद्धांताप्रमाणे समाज कार्याला जोडण्याचा प्रयत्न केल्यास निश्चित " समाजजीवनाची खरी दिशा " मिळू शकते.
 स्वतःच्या समाजाप्रती प्रत्येकाच्या मनातच स्वाभिमानाची भावना निश्चितच असते, परंतु समाजकार्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा व्यक्तिगत आपणच ठरवतो. बरेचदा आपले व्यक्तिगत अनुभव,व सामाजिक विषयावरची निष्क्रियता या मुळे निराशात्मक किंवा नकारार्थक निकष लावून आपण सहजच बोलून जातो.
 जन्मजात कालाधिष्टित गुण, पारंपरिक धार्मिकता व त्या अनुषंगाने आलेली प्रामाणिकता आपल्या समाजात आहेच. समाजाने शैक्षणिक प्रगतीने आपला ठसा उमटविला आहे, तर शहरी व ग्रामीण भागात आजही समाजाच्या विविध समश्येची उकल होणे बाकी आहे. मुळातच आपला समाज हा इत्तर समाजासह "समायोजन" या तत्वात गाव गाड्याचा घटक म्हणून राहिला, पण स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात व संघटित न्याय व हक्क मिळविण्यात उपेक्षित व उदासीन राहिला. बदलत्या परिस्थिनुसार आपल्या मेहनतीने व कर्तृत्वाने काही अंशी झालेली आजची प्रगती, व समाजासमोरील आव्हाने लक्ष्यात घेता बदलत्या काळानुसार सामाजिक जाणिवेतून " दिशादर्शक व कृतिशील सामाजिक चळवळ " उभी राहणे हि पांचाळ समाजाची नितांत गरज आहे.
 "संघटन शक्ती कलयुगे" या उक्तीप्रमाणे आज महाराष्ट्रात अनेक समाजाने सामाजिक संघटना उभ्या केल्या व त्या समाजाच्या ज्वलंत विषयावर प्रखरतेने सामाजिक चळवळीला दिशा दिली.त्याची दखल म्हणून, सरकार दरबारी न्याय व हक्कही मिळविला. या सर्व घटनांचे अवलोकन केल्यास एक सत्य स्पष्ट होते ते कि " समाजजीवनाचे भान, सामाजिक जबाबदारीची जाण व काळाचे ज्ञान " राखून आजच्या घडीला " श्री विश्वकर्मीय पांचाळ सुतार समाज " एकत्र येणे व सामाजिक चळवळीला दिशा दर्शक व कृतिशील करने हे सामाजिक आव्हान आहे.
 "आपला समाज हीच एक आदर्श संघटना आहे व आपण जन्मतः या जात संघटनेचे आजन्म सभासद आहोत. गरज आहे ते प्रत्येकाने आपापल्या परीने समाजऋण म्हणून योगदान देण्याची" संघटनात्मक समाजकार्याचा आढावा घेतल्यास एकसंघ पांचाळ सुतार समाजाचे संघटन असणारी लोकाभिमुख संघटनाव समाजाचे सक्षम नेतृत्वअसणे हि काळाची गरज आहे.
 संघटना या समाजाच्या असाव्यात.व्यक्तिभिमुख संघटना चा गदारोळ म्हणजे गटबाजी व निरर्थक व्यक्तिवाद, आप आपसातील हेवे-दावे व संघटनावाद आला. त्यामुळे आधीच अल्पसंख्याक व गावोगावी विखुरलेल्या समाजात दुफळी निर्माण होऊन दुरावा तयार होऊ शकतो.
 समाजाची सद्दयस्थिती जाणून समाजकार्याला दिशा द्यायची असेल तर समाजाच्या विविध समस्या व न्याय-हक्कासाठी एकत्र येऊन संघर्ष करणे जरुरी आहे. काही समस्या या परिस्थीला जोडून आल्या आहेत व बहुतांश समस्या या केवळ समाज एकसंघ नसल्या कारणाने आहेत. त्या मुळे परंपरागत सांस्कृतिक समतोल ढासळून अराजकता हि निर्माण होण्याची भीती आहे.
 आजच्या स्थितीला स्वयंरोजगार, कारागीर बांधवाना आर्थिक पाठबळ, दुर्बल घटकासाठी शैक्षणिक व आरोग्यविषयक मदत व सर्वच स्तरावर विवाह विषयक अनुरूप स्थळ व हुंडा व खर्चिक अनिष्ठ रूढी परंपरा यांचेवर समाजाचे प्रबोधन होणे हि गरज आहे.
 आजही विश्वकर्मीय पांचाळ समूह जाती, पोटजाती-उपजाती यांचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण केल्यास समाजास स्वतंत्र आरक्षणाचा दर्जा मिळून देण्याचे निकष पूर्ण होऊ शकतात. भविष्यात या विषयावर व्यापक समाज चळवळ उभी करणार आहोत.
 " वाट दिसू देगा देवा, गाठ सुटू दे !" या प्रमाणे पांचाळ समाजातील " सुमती व सूत्रधार " असणाऱ्या विश्वकर्मीय पांचाळ सुतार समाजास संपर्कातून व सामाजिक उपक्रमातून एकत्र यावे लागेल. जेंव्हा समाज आपला आहे तर सामाजिक जबाबदारी हि आपलीच आहे. कोणी बाहेरचा व्यक्ती येऊन आपल्या समाजासाठी काही करणार नाही. केवळ निष्क्रिय प्रतिक्रिया किंवा मनात न्यूनगंड बाळगून काहीच होणार नाही. समाजातील सर्वचजन " सामाजिक कार्यकर्ते " व्हावेत हि अपेक्षा नाही पण समाजघटक म्हणून समाजभिमुख कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहून समाजकार्यात सहभागी होऊ शकतो.नवोदित समाजबांधवाच्या सामाजिक कर्तृत्वातूनच समर्थ नेतृत्व उभे राहील.
 आजच्या व्यस्त जीवनात वेळेचा अभाव प्रत्येकाकडेच आहे. पण समाजकार्यासाठी वेळेचे कारण हे नक्कीच असू शकत नाही. माणूस हा सामाजिक सजीव आहे, सुख:दुःख, समारंभ व मित्र मंडळीसाठी वेळ काढतोच. मग समाजासाठी वेळ नाही का ? उदर्निवाह नंतर भौतिक सुखासाठी आपली चढाओढ असते व त्या अनुषंगाने जीवतोड धावपळ करतो. सर्व आर्थिक सुबत्ता व स्थिरता आल्यानंतर हि समाजात मान-सन्मान असावाच लागतो. काही जण आत्मिक समाधानासाठी अध्यात्माची वाट धरतात. माझ्या मते, अध्यात्माचा परमोच्च अर्थ जर विश्वकल्याणासाठी " पसायदान " असेल तर समाजकार्यात हि अध्यात्मिक समाधान पर्याप्त स्वरूपात मिळणारच.
 शेवटी व्यक्तीसापेक्ष कुटुंब, कुटुंबसापेक्ष समाज व समाज सापेक्ष राष्ट्र निर्मिती होत असेल तर कौटुंबिक भावनेप्रमाणे समाजासाठी कार्याची प्रेरणा मिळू शकते.
 आपण जन्म घेतलेल्या समाजातूनच आपल्याला स्वतःची विशिष्ट ओळख व त्याच समाजाच्या संस्कृतीचा परिवार,नातीगोती व आप्तेष्ट व मान-सन्मानही मिळतो त्या समाजाचे समाजऋण फेडण्याची जाणीव हि आपल्यात असणे हि माणूसपणाचे लक्षण आहे.
 " ईश्वरे दिली काया तिचे सार्थक करावे, स्वधर्म कार्यासाठी अखंड झिजावे !" अपेक्षा एवढीच आहे या "सोशियल मीडियाच्या " माध्यमातून का होईना आपण एकत्र आलो आहोत, यातून सामाजिक सुसंवाद घडावा. त्यातून " प्रत्येक जिवंत विचाराने ज्वलंत होऊन " काळानुरूप सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी व देव,धर्म,न्याय,हक्क मिळविण्यासाठी पारिवारिक भावनेने समाज एकसंघ व्हावा. समाजातील दुर्बल,वंचित घटक हि सामाजिक प्रगतीच्या प्रवाहात सुखाने नांदावेत.
 आपणास वेळ मिळाल्यास प्रतिक्रिया आवश्य पाठवाव्यात, व मांडलेल्या विचारांचे महत्व वाटत असल्यास आपल्या संपर्कातील सामाजिक ग्रुप व समाजबांधवांकडे प्रसारित करावा. " कंकण करी बांधियेलें, जनसेवे जीवन दिधले " या प्रमाणे आम्ही कार्यकर्ते कार्य करू पण या साठी आपला प्रतिसाद हीच प्रेरणा आहे.
🙏🏻 आपलाच, 🙏🏻
सदैव समाज ऋणात,
श्री बाळासाहेब ना.पांचाळ
कार्यसेवक,
श्री विश्वकर्मा युवा क्रांती संघ 
📱9527780099
tweet : @Balasaheb_Panchal

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: