शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

                                               क्रांतिसिंह रामचंद्र कृष्णाजी सुतार 

                                            हौतात्म्य ०९ सप्टेंबर १९४२ वडुज-खटाव 

                                             सुतार कुलवंताचा रक्ताभिषेक..

✨ बांधवानो, स्वातंत्र्याचा इतिहास वाचतांना "क्रांतिकारी सुतार" या पानांना आज उजाळा देऊन सामाजिक प्रेरणेच्या पटलावर पुन्हा उभे केल्यास समाजातील जिवंत विचार निश्चितच ज्वलंत होतील.

✨ पारंपरिक बलुतेदारातील "सुतार" समाजाला कृषक संस्कृतीमध्ये महत्वाच स्थान आहे. सोबतच स्थापत्य, धर्मसंस्थापणा व सांस्कृतिक व आध्यात्मिक चळवळीतील "सुतारांचे" योगदान साऱ्या महाराष्ट्राला अधोरेखीत आहे.ज्याप्रमाणे बहुजन संत नामदेव, संत भोजलिंग काका ते जगतगुरु तुकोबांरायापर्यंत वारकरी संप्रदाय रुजवून मानवमुक्तीची चळवळ उभी केली महाराष्ट्रात समता प्रस्थापित केली. त्याच प्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात ही बलुतेदारांनी आपली हिस्सेदारी दिली आहे.स्वराजापासून ते स्वातंत्र्याच्या लढ्यात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्य देवीची उपासना देखील केली आहे. आज त्याच इतिहासाला उजाळा देण्याचा हा क्रांती प्रयत्न !

✨ ०९ आॅगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांविरुद्ध निकराचा लढा देण्यासाठी महात्मा गांधींनी "चले जाव" चा नारा दिला. बघतां बघतां देशभरात हजारो मोर्चे निघाले. संपुर्ण देशभरात ब्रिटिशांविरुद्ध वणवा पेटला.आणि सर्वच कार्यकर्ते मोर्चे बांधू लागले. याची ठिणगी देशाप्रमाणे सातारा जिल्ह्यातही पेटू लागली. या क्रांती चळवळीच्या सूत्रधारांमध्ये वडगाव( जयराम स्वामी) ऐन उम्मेदीतील *रामचंद्र कृष्णाजी सुतार हे स्वातंत्र्य समराला वाहिलेले नेतृत्व होते.अवघ्या ३२ वर्षीय तरुण रामचंद्रांच्या घरात केवळ ९ दिवसाचे नवजात बाळ होते. तरीही मातृभूमीला परकीयांच्या पाशातून मुक्त करण्याकरिता त्यांनी घर-संसारावर तुळशी पत्र ठेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात वाहून घेतले

रामचंद्र सुतारांनी आपले सहकारी बॅ.आप्पासाहेब पंत, बंडोपंत लोमटे, गौरीहर सिंहासने, दादासाहेब साखवळकर, नानासाहेब आयाचित, पिलोबा वडूजकर, रामभाऊ नलवडे, माणिकचंद दोशी, बापूराव कचरे यांच्या सोबत गावोगावी गुप्त बैठका घेवून ९ सप्टेंबर १९४२ रोजी वडूज येथे मामलेदार कचेरीवर मोर्चा यशस्वी करण्याचे ठरविले.

✨ ९ सप्टेंबर १९४२ रोजी पहाटे, राउळातुन क्रांतिची मशाल पेटवून, अंगात पांढरा सदरा व पांढरा पायजमा, डोक्यावर पांढरी टोपी, एका हातात भाकरी आणि दुसऱ्या हातात तिरंगा आणि मुखातून भारतमातेचा जयघोष करत मोर्चा चालू लागला.हा विराट मोर्चा जयराम स्वामी वडगाव येथून सकाळी ६ वाजता वडूजकडे चालत निघाला. मोर्चात १५०० लोक सामील झाले होते. वडगाव ते वडूज हे १३ मैलाचे अंतर तोडून पायी निघालेला मोर्चा स्वार्थ साधण्यासाठी किंवा काही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी निघाला नव्हता तर मातृभूमीच्या मुक्ततेसाठी प्राण गमविण्यासाठी व इंग्रजांच्या जुलमी छळाला प्रत्युत्तर देण्यासाठी होता. सकाळी ६ वाजता निघालेला मोर्चा दुपारी ११ वाजता वडूजला येऊन पोहोचलो व १२ वाजता कचेरीवर आला.

वातावरण तापले होते.गो-या शिपायांचा कडक बंदोबस्त होता.त्यावेळी मामलेदार अंकली तर फौजदार बिंडीगिरी होते. मोर्चा कचेरीजवळ आल्यानंतर परशूराम घार्गे खांदयावर तिरंगी झेंडा घेऊन उभे होते. "वंदे मातरम् भारत माता की जय" अशा गगनाला भिडणा-या घोषणा दिल्या जात होत्या. मामलेदार अंकली व फौजदार बिंडीगिरी यांनी मोर्चा कचेरीपासून १५० फूटावर असलेल्या गोविंदराव महादेव शिंदे यांच्या हॉटेलाजवळ अडवला.अडवून ठेवलेल्या मोर्चाने भर उन्हात तेथेच बैठक मारली.

✨मात्र,कोणताही गुन्हा नसताना अचानक बेसावध झालेल्या मोर्चावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेली तरच बंदुकीचा वापर करायचा असतो आणि तोही पायावर गोळया मारायाच्या असतात.परंतू ब्रिटिशांच्या या निर्दयी पोलिसांनी सर्व संकेत धाब्यावर बसवून मोर्चाचे नेतृत्व करणा-या परशूराम घार्गे यांच्यावर एका मागून एक अशा गोळ्या झाडल्या,सहकारी परशुरामाच्या हातात असेलेला तिरंगा जमिनीवर यायच्या आत तरुण,तडफदार रामचंद्र सुतार सरसावले त्यांनी मित्राच्या रक्तरंजित देहाला कडाडून मिठी मारली व सिंहाच्या आवेशात तिरंगा आपल्या हाती घेऊन "वंदे मातरम" च्या जयघोषात क्रांतीचे सूत्र आपल्या हाती घेतले. मोर्चा अधिक आक्रमकपने मामलेदार कचेरीवर धाव घेऊ लागला. कचरेवरील इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून तिथे तिरंगा फडकविला जाईल याची धास्ती इंग्रजांना झाली.

मामलेदाराने आणि इतरांनाही बंदूकी चालविण्याचा हुकूम दिला. हातात तिरंगा घेऊन सिंहझेप घेणाऱ्या रामचंद्रांवर बंदुकीतून गोळ्याच्या फैरी डागू लागल्या, एक गोळी चित्त मस्तकाला भेदली, कवटीसह मेंदूचे चिथडे उडाले आणि क्रांतीचा सूत्रधार रामचंद्र सुतार धारार्थी पडला. साक्षात स्वातंत्र्यदेवीने रामचंद्रासारख्या मायेच्या पुताला रक्तचंदनाने अभिषेक करून गौरवान्वित केला, तर निपचित पडलेल्या देहातही "तिरंगा" खाली न झुकू देता रामचंद्र सुतारांनी सर्वोच्च बलिदान दिले.

✨निर्दशकांची धावपळ सुरू झाली. जवळ कोणतेच हत्यार नाही. अशावेळी गोळ्यांच्या वर्षावाने जागच्या जागीच पाचजणांनी होतात्म्य पत्करले.चारजण गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांना हौतात्म्य आले.शेकडोजण कायमचे जायबंदी झाले. यात परशुराम श्रीपती घार्गे,किसन बाळा भोसले,खाशाबा मारूती शिंदे, सिदु पवार,रामचंद्र कृष्णा सुतार,बलभीम हरी खटावकर,बाळकृष्ण दिगंबर खटावकर,श्रीरंग शिंदे, आनंद श्रीपती गायकवाड या ९जणांचे मृतदेह दहिवडीला नेण्यात आले.

स्वता:च्या रक्ताचे शिंपण करून स्वातंत्र्याच्या ऊर्मीची कारंजी उसळत ठेवली.एक नव्हे तर नऊ स्वातंत्र्यवीरांचे देह तेथे पडले. येथेच प्रति सरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणा-या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जनक्रांती केली. पोस्टर जाळणे,भूमागत चळवळीत करणे,सरकारी तिजोरीवर दरोडे घालून सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण करणे. अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या.

✨स्वातंत्र्याच्या आंदोलनात ९ हुतात्म्यांनी जी भरीव कामगिरी केली,त्याची ओळख आजच्या नवीन पिढीला जवळजवळ नाही म्हटले तरी चालेल.कारण स्वातंत्र्याची मधूर फळे मुक्तपणे चाखणा-या आजच्या पिढीला अशा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे दिव्य जीवन समजले तर त्यांनी केलेला त्याग व आजचे कर्तव्य याचा जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.

निधड्या छातीवर हसतहसत गोळ्या झेलणार्र्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत वंदे मातरम् चा जयघोष करणार्या शुर विरांना सलाम. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.परंतु मोबाईल इंटरनेटच्या आजच्या या पिढीला हा रक्तरंजित इतिहास माहित आहे का? हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य उपभोगताना आपला जाज्वल्य इतिहास विसरून कसे चालेल ? ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाहुती देऊन हौतात्म्य पत्करले, आणि "सुतार समाजाला" क्रांतीमय बनवले.


🚩 वंदे मातरम 🚩

भारत माता की जय 

संकलन,

दत्तात्रय सुतार, इचलकरंजी

बाळासाहेब सुतार,नांदेड


मार्गदर्शक दुवे :

▪️श्री चंद्रकांतजी कांडेकरी,कोल्हापूर 

▪️श्री अर्जुन सुतार,इचलकरंजी 

▪️श्री शिवाजी नाना सुतार, सातारा 

🌏 https/ /SutarmahaKranti.blogspot.in 

प्रकाशित :

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: