रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

मा. आर्किटेक्ट विजय सुतार साहेब,मुंबई (मूळ गाव चंदगड,कोल्हापूर)यांचा सुतार व्यवसाय संदर्भातील अभ्यासपूर्ण लेख#आर्किटेक्चरटेल्स@IKEA@_सुतार !!


IKEA म्हणजे ईकी, इकिआ किंवा आयकीया काहीही म्हणा, सर्व प्रकारचे फर्निचर बनविणाऱ्या या जगांतील सर्वात मोठ्या स्वीडिश कंपनीने काल भारतांतील आपले पहिलेवहिले शोरूम हैदराबाद या तुमची स्वप्नं गोंजारणाऱ्या हायटेक शहरांत उघडले आहे. तब्बल तेरा एकर जागेत चार लाख स्क्वेअर फूट डिस्प्ले एरिया अन जवळपास साडेसात हजार उत्पादने एकाच छतांखाली उपलब्ध असणारी ही शोरूम म्हणजे एक फर्निचरनगरीच असणार आहे. एकट्या हैदराबाद शहरांतील या शोरूमला वर्षाकाठी सुमारे साठ लाख लोक भेट देतील असा कंपनीचा दावा आहे. या अवाढव्य शोरूममध्ये अगदी शंभर रुपयांपासून सुरुवात होणारे अन आधुनिक फर्निचरची निकड असलेले शो पीस, कटलरी अन टॉईजदेखील मिळणार आहेत. या भव्य शोरूमसोबत भारतांतील सर्वात मोठे तब्बल एक हजार लोक एकाच वेळी बसू शकतील इतकं भव्य रेस्टॉरंट सुद्धा असणार आहे की जिथे अस्सल भारतीय चवीची बिर्याणी, दालफ्राय, समोसा, इडलीसोबत स्वीडिश अन आंतरराष्ट्रीय व्यंजनेसुद्धा मिळणार आहेत.

खरंतर कंपनीने २००६ मध्येच भारतांत येण्याचा प्रयत्न केला होता पण आपल्याकडील थेट परकीय गुंतवणूकीसाठी आवश्यक असलेला स्थानिक व्यापारी कंपनीसोबत कराव्या लागणाऱ्या भागीदारीचा त्यावेळचा नियम त्यांना रुचला न्हवता. या बारा वर्षांत कंपनीने संपूर्ण भारतीय बाजारपेठ अन भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास अन त्यांवर संशोधन केलेलं आहे. अत्याधुनिक साहित्यांबरोबरच अगदी पारंपरिक भारतीय स्वयंपाकघरांतील मसाल्याचे डबे कसे असावे, इडलीवडा शिजवण्यासाठी काय काय भांडी लागणार आहेत, पोळ्या लाटण्यासाठी लागणारं पोळपाट लाटणं ते भजीसमोसा बनण्यातळण्यासाठी लागणारी आयुधं सर्वकाही यांच्याकडे मिळणार आहे. आता ते तब्बल एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक भारतांत करताहेत, त्यांची दुसरी शोरुम मुंबईमध्ये २०१९ मध्ये उघडते आहे आणि २०२५ पर्यंत भारतांतील प्रमुख शहरांत एकूण पंचवीस शोरूम असणार आहेत. पंचवीस हजार स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा कंपनीचा मानस आहे ज्यापैकी अर्ध्याहून अधिक महिला असणार आहेत.
तर मी नंतरचा आर्किटेक्ट पण मूळचा पारंपरिक अन स्वतः सुतारकाम करणारा सुतार, ही कथा सांगण्याचा माझा उद्देश वेगळाच आहे. इथे आयकीयामध्ये फर्निचर खरेदी करतांना कंपनी Do it yourself अशी एक सुविधा देणार आहे की ज्याद्वारे तुम्ही खरेदी करत असलेलं फर्निचर बनवतांना त्यात तुमचाही सहभाग असणार आहे. खरंतर ग्राहकांना खुश करण्याचा हा बिझनेस फंडा आहे अन तो कॅच करणे हाच तर खरा बिझनेस असतो. कंपनीनियुक्त सुतार तुम्हांला सोबत घेणार अन आधीच तयार असलेले सुटे भाग एकत्र करुन तुमचं कपाट तुमच्यासमोर जोडून तयार होणार म्हणजे थोडक्यांत आपण नेहमीच्या वडापावच्या गाडीवर उभं राहून आजची खास निवड म्हणून जशी गरमागरम कांदाभजी बनवून घेतो तसाच हा प्रकार आहे. आता कंपनी काही निष्णात सुतारांना घसघशीत मोबदला देऊन कामांवर ठेवून घेईलही अन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली म्हणून माझे जातबांधव जल्लोषही साजरा करतील, करुद्यात. मला या सगळ्यांत तो हत्यारांची पिशवी पाठीवर मारुन इमानइतबारे काम करणारा सुतार दिसतो आहे. सोबत जाणवत आहेत ते तो देत असलेले मरणासन्न आचके अन आधीच भिंतीवर टांगलेली, कधीकाळी बलुतेदार म्हणून राजाश्रय मिळून प्रसिद्धी पावलेली ती सुतार या व्यवसायाची प्रतिमा की जी प्रतिमा हे लिहिण्यास उद्युक्त करत आहे.

आता आधीच गुणवत्तेची वानवा असलेल्या आपल्या भारतीय फर्निचर बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा अन मारामारीदेखील आहे. प्रत्येक शहरी गोदरेज,ड्यूरियन सारखे ब्रँड काही प्रमाणांत गुणवत्ता राखून आहेत तर काही चायनीज, मलेशियन तकलादू निनावी ब्रँड आहेत, शिवाय लोकल उत्पादक अन एकदाच भेटणारे कॉन्ट्रॅक्टर तर पावलांपावलांवर आहेत. आता यात काही ठिकाणी तुम्हांला क्वालिटी मिळू शकेलही पण आयुष्यभर टिकणारं फर्निचर अन ते बनविणारा सुतार तुम्हांला अजिबात भेटणार नाही. कदाचित बदलत्या काळांबरोबर चालणाऱ्यांना आयुष्यभर टिकणाऱ्या फर्निचरची आवश्यकता नसणार आहे पण अल्पजीवी फर्निचर बनवतांना काही पळवाटा शोधाव्या लागतात अन हे असं करणं म्हणजे आपली या व्यवसायांप्रती असलेली निष्ठा नक्कीच न्हवे. एक सुतार म्हणून मी हा विचार करतो आहे पण असा विचार करुन आजच्या बेगडी जगांत माझं पोट भरत नाहीय हेही कटू सत्य आहे. म्हणूनच कधीकधी वाटतं त्यावेळी पै पै जमवून आर्किटेक्चरची पदवी माझ्या नावापुढे जोडून घेतली ते फार बरं झालं. तेव्हां केवळ बारावीतल्या गुणांमुळे तिथे प्रवेश मिळाला तो जर मिळाला नसता तर मी सुतारकामच करणार होतो अन पैसे भरुन आर्किटेक्चर शिकवण्याची सुतारकाम करणाऱ्या माझ्या वडिलांची ऐपत नक्कीच न्हवती.

माफ करा पण जातीचा उल्लेख करतोच आहे, पूर्वी जो अस्सल कारागीर असलेला जातीवंत सुतार अतिशय मेहनती असलेले हे सुतारकाम करुन आपलं सुतार हे अस्तित्व अबाधित रहाण्यासाठी संघर्ष करत होता अन करतोही आहे तो आता काही वर्षांत धराशायी होणार आहे. खरंतर आपल्या देशाने पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हां मुक्त अर्थव्यवस्थेचा जो अंगीकार केला तेव्हांपासून ही सुरुवात प्रकर्षाने झालेली आहे. सुरुवातीपासून आम्ही सुतार परंपरेने चालत आलेला आमचा हा मेहनती व्यवसाय अत्यंत निष्ठेने करत आलो आहोत पण आजकाल सुतारकाम करणारा हा सुतारच असतो असं अजिबात नाहीय. खूपवेळेस उदरभरण, काहीवेळेस गरज अन मुंबईसारख्या शहरांत मिळणारी भरघोस मजुरी पाहूनच बरेचसे लोक या व्यवसायांत आले अन गुणवत्ता बिघडली. पुढे यांत सवयीप्रमाणे आधी राजस्थानी सुतार, मग उत्तर भारतीय कुणीही आले अन आपल्या सुतार म्हणजे मराठी माणसांच्या टिपिकल अवगुणांमुळे त्यांच्या पोटांवर न्हवे तर नरड्यांवर पाय देऊन उभे राहिले.

एक उदाहरण देईन,एक सागवानी फ्रेमचा लॅमिनेट फिनिश्ड डिझाईनर डबल बेड करण्यासाठी मी साधारण दहा हजार रुपये मजुरी घेईन याच कामाचे कुणी एकजण पाच हजार सांगेल. अर्थातच काम देणारा पाच हजारवाल्याला बोलावेल,पाच हजार घेणारा काम होईपर्यंत तुमच्याशी पॉझिटिव्ह बोलेल, तुम्हांला कुठलीही गॅरंटी देणार नाही अन काही तक्रार आली तर कदाचित तो पुन्हा भेटणारही नाही. मग काम देणाऱ्यांनी ही तक्रार निवारण्यासाठी कितीही विनंती केली तर माझ्या स्वभावबरहुकूम मी जाणार नाही. मग त्याच्यासारखाच तिसरा कुणी तिथे येणार अथवा तो बेड तसाच नादुरुस्त अवस्थेत वापरला जाणार हे सत्य आहे. हे राहुद्यात, महाराष्ट्रातील एका मोठ्या शहरांत रहाणारा माझा एक मित्र तिथला टॉप आर्किटेक्ट आहे त्याने मुंबईत एका मैत्रिणीचे इंटेरिअर्सचे काम सुरु केले. नेहमीच्या साईट व्हिझिटसाठी विनंती करुन त्याने मला तयार केले अन तीन महिन्यांच्या कामांत त्याने दोनच साईट व्हिझिट केल्या. अर्थात माझी टीम वापरुन त्याच्या संकल्पनेतील काम करतांना मला भयंकर त्रास झाला पण मी ते यशस्वी केलं. आम्ही सांगू ती पूर्व दिशा मानणाऱ्या त्या क्लायंट म्हणजे मैत्रिणीकडून कुठलाही हस्तक्षेप अथवा पैशांबाबत कसलीही तक्रार न्हवती पण या कामांदरम्यान मला मित्रांच्या काही सवयी प्रचंड खटकल्या. आधुनिकता, गुणवत्तेत तडजोड करायची नाही हे माझं तत्व पण ते त्याला मान्य न्हवतं म्हणून मैत्रिणीकडून संमती घेऊन मी ऍडव्हान्स दिलेल्या काही ऑर्डर्स त्याने कॅन्सल करावयास लावल्या. मित्र म्हणून ते मी सहन केलं पण माझ्यातल्या सुतारांला ते पटलं नाही अन ते मी मैत्रिणीला बोलून दाखवलं. ती तर माणूस म्हणून सर्वोत्तम होती तिने आम्हां दोघांमध्ये काही अनबन होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.

पन्नास वर्षांपूर्वी मायानगरी मुंबईत एक कसबी,उत्कृष्ट दर्जाचे काम करणारे सुतार म्हणून वडील,काकांनी नावलौकिक, पैसा मिळवला. आता काही खाष्ट सवयींमुळे त्यांचा तो रुबाब टिकला नाही हा भाग वेगळा पण वर मी वर्णिलेल्या बदलांचा फार मोठा फटका या मंडळींना उतारवयात बसला. हा उतारवयाचा काळ म्हणजे तोच मुक्त अर्थव्यवस्थेचा सुरुवातीचा काळ होता. हे लोक जेव्हां एकत्र काम करत तेव्हां तिथे जवळपास पन्नासेक अस्सल मराठमोळे कारागीर सुखाने काम करायचे. अर्थात कामांच्या मानाने यांचे कामाचे दामही तसेच मजबूत असायचे अन विशेष म्हणजे लोकही अत्यंत खुश होऊन ते विनातक्रार देत असत. नंतर ही मुक्त अर्थव्यवस्था या सगळ्यांच्या मुळावर उठली अन गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करणारे हे सगळे लोक देशोधडीला लागले.

म्हणजे थोडक्यांत काय तर तो लाकूड कापतांना, रंधा मारतांना घाम गाळणारा जो सुतार होता तो आता थोड्याच दिवसांत इतिहासजमा होईल. याला जबाबदार घटक म्हणजे तो स्वतः, आपल्याकडील व्यवस्था, व्यवस्थेची मानसिकता, व्यवस्थेची काही गळचेपी धोरणं, आपल्याकडील सटरफटर असलेल्या काही आस्थापना अन आता आलेली ही महाकाय IKEA, अजून पुढे कायकाय ते आता पाहूयांत !!
सुतार ..
विजय !!!! 

सोमवार, १८ जून, २०१८

अहमदनगर येथील आयोजित राज्यस्तरीय चिंतन बैठक-२०१८


*अहमदनगर येथील आयोजित राज्यस्तरीय चिंतन बैठक-२०१८ च्या निम्मिताने*
--------------------------------------------------------------------------------------
बांधवानो सस्नेह जय श्री प्रभू विश्वकर्मा ! बांधवानो अहमदनगर येथे दि.२३ जून रोजी *राज्यस्तरीय समाज चिंतन बैठक-२०१८* आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने समाजातील विविध विषय, सामाजिक घडामोडी,आव्हाने, प्रलंबित विविध मागण्या शासन स्तरावर नियोजनबद्ध पद्धतीने मांडण्यासाठी व येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट स्तरावर समाज चळवळीस कार्यशील व दिशादर्शक करण्याबाबत सामाजिक संवाद साधण्याच्या यशस्वी प्रयत्न करण्यात येणार आहे.
विविध समाजाप्रमाणे आपल्या समाजात हि विविध संघटना व आप आपल्या परीने सामाजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. परंतु आप-आपसात समनव्य नसल्याकारणाने राज्यस्तरावर समाजाची एकसंघ शक्ती एकवटू शकली नाही हे आपणास मान्यच करावे लागेल. जो पर्यंत राज्यस्तरावर एकसूत्री व विधायक पद्धतीने एकत्र येणार नाही तो पर्यंत शासन स्तरावर दाद मिळणार नाही.
बांधवानो, व्यक्तिगत स्वरूपात आपण चिंतन करून कौटुंबिक नियोजन करतो, ती व्यक्तिगत जबाबदारी असतेच त्या सोबत आपल्या समाजासमोरील विविध आव्हाने, व परिस्थितीचा आढावा घेऊन सामाजिक चिंतन होणेही तेवढेच महत्वाचे आहे. आणि त्याची सुरुवात हि सामाजिक जाणीव म्हणून स्वतः पासूनच सुरुवात होणे गरजेचे आहे.
बांधवानो, आपल्या समाजात कार्यरत विविध संघटना, संस्था व कार्यशील सामाजिक कार्यकर्ते आहेत हे देखील समाजाचे संचित आहे. याच संचिताना योग्य दिशा दिल्यास राज्यस्तरावर सामाजिक एकता दिसु शकते.त्यासोबतच राजकीय व शासकीय स्तरावर समाजाचे अभ्यासू ,परिपूर्ण नेतृत्वास संधी मिळू शकते.
याच सामाजिक विषयावर अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाच्या पुढाकारातून अहमदनगर येथे राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.समाजाचे अभ्यासू व बहुआयामी कार्यशील नेतृत्व *श्री. सुदाम अण्णा खैरनार, मालेगाव* व राज्यस्तरावर समाजकार्यात मनमिळावू, सहज व संवेदनशील सामाजिक नेतृत्व *श्री. प्रदीपजी जानवे साहेब* यांचे मार्गदर्शन व सोबतच शासन स्तरावर सामाजिक विषयाला साक्ष करण्याकरिता राजकीय प्रतिनिधी ची उपस्थिती असणार आहे.
*बांधवानो आपणास आवाहन करतो कि, समाजाची जाण व काळाचे भान राखून कोणताही किंतु-परंतु अथवा संघटनात्मक भेदाभेद मनात न ठेवता " प्रथम प्राधान्य समाज " समोर ठेवून या चिंतन बैठकीस आवश्य उपस्थित राहून सामाजिक संवादात सहभाग नोंदवावा.*
संघटना या समाजाच्या असतात, विविध संघटनामुळे सामाजिक कार्यकर्ते निर्माण होऊन समाजाची एकता शोभित व्हायला पाहिजे, दिशाहीन, ध्येयाविहीन व स्व-महत्वाकांक्षी व बेगडी पद- प्रतिष्ठेपायी अथवा व्यक्तिगत हेवेदाव्यामुळे समाजाचे विघटन होणार नाही याची जबाबदारी आपणासर्वांचीच आहे.
धन्यवाद !
जय श्री प्रभू विश्वकर्मा !
आपल्या सैदव समाज ऋणात,
*श्री बाळासाहेब ना.पांचाळ, नांदेड*
संयोजक, श्री विश्वकर्मा सुतार युवा क्रांती
संपर्क: ९५२७७८००९९
https://www.facebook.com/sutar.yuvakranti.7
http://sutarmahakranti.blogspot.com


सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

💢 महाराष्ट्र श्री विश्वकर्मामय सुतार समाज महासंघ 💢
🛑 ३० वा राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय सोहळा 🛑


श्री विश्वकर्मीय सुतार समाजाची शत्तकोत्तर संघटना महाराष्ट्र श्री विश्वकर्मामय सुतार समाज महासंघ तर्फे दि. 23 व 24 डिसेंबर २०१७ रोजी वणी, यवतमाळ येथे ३० वा राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय सोहळा अतिशय उत्सहात संपन्न झाला.

महासंघाचे अध्यक्ष व जेष्ठ समाजबंधू श्री. प्रदीपजी जानवे दादा यांच्या प्रेमळ सहवासात या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे अहोभाग्य मला प्राप्त झाले. समाजहिताचे समाजकारण या आग्रही भूमिकेतून महासंघाने राबविलेला हा समाजउपयोगी उपक्रम अतिशय सकारात्मक व शिस्तबद्ध पार पडला. विशेष म्हणजे या उपक्रमास संपूर्ण राज्यातील सर्व वर्गातील समाजबांधव सहभागी होते.

वैवाहिक नातेसंबंध जोडताना होणारा समाजबांधवांच्या आर्थिक व वेळेचा खर्चास या  उपवर-वधू परिचय सोहळा सोहळ्यातून समाजास निश्चितच दिलासा मिळतो. समाजातील तरुण पिढीसाठी त्यांचे आयुष्याचे भावी जोडीदार निवडण्यास मदत होते.

माझ्या मते राज्यात विविध भागात आयोजित होणारे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय उपवर-वधू परिचय सोहळे जर सर्व आयोजकांनी एकत्र जर केले तर निश्चितच समाजास दुप्पट उपलब्धी मिळू शकते व नियोजन हि व्यवस्थित करता येऊ शकते.

महाराष्ट्र श्री विश्वकर्मामय सुतार समाज महासंघ व समाजाचे सक्षम व सहज नेतृत्व करणारे आदरणीय श्री प्रदीपजी जानवे साहेब यांच्या भावी कार्यास अनेक शुभेच्छा !
श्री प्रभु विश्वकर्मा आपणांस उदंड कार्यबळ प्रदान करो !
 !! जय श्री प्रभु विश्वकर्मा !!

श्री बाळासाहेब पांचाळ
नांदेड

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

सामाजिक मागण्यांसंदर्भात निवेदन


११ डिसेंबरपासून नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. राज्याचे मंत्री, राज्यभरातील आमदार आणि प्रत्येक विभागाच्या सचिवांसह सारेच अधिकारी नागपुरात दाखल होत आहेत. इत्तर समाजाप्रमाणे आपल्याही समाजाच्या विविध विषयावर लक्ष्य वेधण्यासाठी  नागपुरातील हिवाळी अधिवेशनापुढे मांडण्याची संधी मिळणार आहे.

श्री विश्वकर्मीय पांचाळ  समाजाच्या न्याय-हक्क मागण्या संदर्भात श्री विश्वकर्मा श्रमिक क्रांती संघाच्या वतीने मा. मुख्यमंत्री महोदयांना सामाजिक मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात येत आहे. 

समाजाच्या विविध विषयावर मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अधिकृतपने राखीव वेळ घेऊन शिस्टमंडळ गठीत करून समाजहिताच्या मागण्यांचे निवेदन व प्रत्यक्ष चर्चा मंत्रालय,मुंबई येथे देण्यात येईल.


सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

समाजसंपर्क व निशुल्क उपवर-वधू नोंदणी

💢 श्री विश्वकर्मा सुतार युवा क्रांती 💢 

   समाजसंपर्क व निशुल्क उपवर-वधू नोंदणी 

समाजप्रेमी बांधवानो, सस्नेह जय श्री प्रभु विश्वकर्मा !

समाजहिताच्याच समाजकार्यासाठी प्रेरित श्री विश्वकर्मा सुतार युवा क्रांती या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सुतार समाज एकसंघ करण्यासाठी संपर्क व नातेसंबंध जोडण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. अगदी सोपे तंत्रज्ञान व निशुल्क तत्वावर सुतार समाज संपर्क नोंदणी व उपवर वधु-वर नोंदणी ची सेवा देण्यात येत आहे.

 प्रत्यक्ष संपर्क करून, आकर्षक व सोप्या पद्धतीने इंटरनेटवर तसेच परिचय पुस्तकेच्या माध्यमातून समाजापर्यंत हि माहिती पोहोचवायचा युवा क्रांतीचा प्रयत्न करण्यात येईल.

समाज संपर्क नोंदीकरिता खालील लिंक :
https://goo.gl/forms/mFbSgPD2mJ7ykAqt1
वधुवर नोंदणीकरिता खालील लिंक:
https://goo.gl/forms/lH12PcP1wI9TjxDW2

युवा क्रांतीच्या http://sutarmahakranti.blogspot.in या ब्लॉगवर या लिंक जोडण्यात आलेल्या आहेत.सर्वानी ब्लॉगवर भेट द्यावी.

कृपया या लिंकवर आपला संर्पक परिचय व समाजकार्य म्हणून इत्तर परिचित नातेवाईकांचा परिचय नोंदवा. जास्तीत जास्त समाजबांधवांना लाभ घेता यावा म्हणून हा मॅसेज सर्वत्र पाठवा.

आपलाच,
सदैव समाजऋणात,
श्री बाळासाहेब पांचाळ
प्रमुख कार्यसेवक
📱 9527780099

शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

सामाजिक संवादक्रांती : sutarmahakranti.blogspot.in

💢 श्री विश्वकर्मा सुतार युवा क्रांती 💢 

💢 सामाजिक संवादक्रांती : सुतारमहाक्रांती ब्लॉग 💢 

सन्मानीय समाजप्रेमी स्नेहीजन,
सस्नेह नमस्कार..जय श्री प्रभु विश्वकर्मा !

श्री विश्वकर्मा सुतार युवा क्रांती या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विश्वकर्मीय समाजचळवळीस दिशादर्शक व कृतिशील कार्यध्येयासी आपण सर्वजण संकल्पित व समर्पित आहोत.  

"आपला समाज हीच एक आदर्श संघटना आहे व आपण प्रत्येकजण जन्मतः च या आदर्श संघटनेचे आजीव सभासद आहोत. गरज आहे ती फक्त प्रत्येकाने समाजऋण म्हणून स्वयंप्रेरणेने आप आपले योगदान अर्पित करण्याची." त्या कारणाने व्यक्तिवाद व पदप्रतिष्ठा न बाळगता केवळ समाजप्रेम या उदात्त हेतूशी प्रामाणिक राहून समाजकारणाला सक्षम करण्याचा युवा क्रांतीचा प्रयत्न आहे.

वास्तविक पाहता आपण सर्वजण एकमेकांचे नातेसंबंधीच आहोत, त्याच प्रेमभावनेने परिवारजन म्हणून एकत्र आलो तरी महासंघटनेचे स्वरूप येणार आहे व हे होणारच...कारण याच ध्येयासाठी युवा क्रांती संकल्पित आहे व त्यायोगे आवश्यक युक्ती व बळवंत नीतीचे आपल्याच समाजातील सुशीक्षीत तरुण सक्षम युवा मित्राकडे व यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याचा समर्थ प्रयत्न म्हणजे श्री विश्वकर्मा सुतार युवा क्रांती आहे.

तसे पाहता युवा क्रांतीचा कार्यकाळ जरी अल्प असला तरी, अभ्यासपूर्ण विशिष्ट कार्यशैली, सातत्य, समर्पित भावना व परिवर्तनवादी पुरोगामी विचाराने प्रेरित सर्वसामान्यांच्या हिताचे समाजकारण या मुळे परंपरागत समजुतीचे सीमोल्लंघन कधीच केले आहे. अर्थातच हि चळवळ महाराष्ट्रव्यापी होण्याचे श्रेय प्रतिसाद देणारे समाजप्रेमी बांधव, सक्षम युवा कार्यकर्ते व कर्तबगार जेष्ठ मार्गदर्शक  उदंड मायेने पाठबळ देणारा समाज होय.

पूर्वकालीन समाजामध्ये संवाद,प्रसार  किंवा इत्तर माध्यमांची एवढी रेलचेल नव्हती व त्या पिढीमध्ये आज रोजी सारख्या विविध संघटनाहि नव्हत्या किंवा इत्तर अनावश्यक गोष्टींचा उठाठेव करण्याची देखील आपल्या वाड-वडिलांना गरज वाटली नसावी कारण त्यांचा संपर्क हा सातत्याने होत असे.

आजच्या स्थितीला संवादासहित सर्वच माध्यमाची सोयीस्कर उपलब्धी आहे व  सर्वच क्षेत्रामध्ये समाज प्रगती पथावर आहे तरी समाजजीवन पार बदलून गेलेले आहे. स्वहितासाठी व्यस्त व्यक्तिगत जीवन, प्रबोधनाअभावी समाजाप्रती असलेली उदासीन भावना यामुळे सामाजिक विषमता निर्माण होण्याची भीती वाटते. आधीच गावोगावी,खेड्यापाड्यात विखुरलेला आपला अल्पसंख्याक समाज आजही विकासाच्या प्रवाहापासून दूर आहे तो दुरावा कमी करणे या साठी सकारात्मक "सामाजिक संवाद " वाढविणे हेच सामाजिक कार्य या पुढे आपणास करावयाचे आहे.

सामाजिक भावनेने आजच्या " सोशियल मीडियाचा " जर योग्य वापर केला तर वैचारिक क्रांती येऊ शकते या साठी युवा क्रांतीच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न असतो. " सोशियल मीडियाचा " स्तर सामाजिक विचारांचा असावा या साठी युवा क्रांतीचे व्हाट्सअँप ग्रुप व फेसबुक आहेतच या पुढील माध्यम म्हणून वेबसाईट व मोबाइल अँपचा प्रयत्न प्रयोगात आहे व लवकरच तो समाजर्पण करण्यात येईल.

सामाजिक विचारमंथनासह व्यापक संपर्काकरिता समाज संपर्क नोंदणी, वधुवर परिचय व श्रमिक क्रांतीसंघाच्या सदस्य नोंदणी सह सामाजिक संवादासाठी युवा क्रांतीचा अधिकृत सुतारमहाक्रांती ब्लॉग http://sutarmahakranti.blogspot.in/ आम्ही समाजार्पण करीत आहोत. आपण या आकर्षक व माहितीपूर्ण ब्लॉगच्या माध्यमातून वेबसाईट प्रमाणे अगदी सोप्या पद्धतीत सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.

आपणास विनंती आहे कि या ब्लॉग चा जास्तीस्त जास्त प्रसार करावा व समाज समाज संपर्क नोंदणी, वधुवर परिचय नोंदणी वर आपल्या परिचित पाहुणे मंडळींची नोंदणी करावी.

आपलाच,
सदैव समाजऋणात,
श्री.बाळासाहेब ना. पांचाळ
प्रमुख कार्यसेवक,

श्री विश्वकर्मा युवा क्रांती

संपर्क- 9527780099

गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

समाज जीवन,सामाजिक जाणींव व समाजकार्याची दिशा.

💢 विश्वकर्मीय पांचाळ सुतार समाज 💢

 समाज जीवन,सामाजिक जाणींव व समाजकार्याची दिशा.


सस्नेह नमस्कार, जय श्री प्रभु विश्वकर्मा ! 🙏🏻🙏🏻
 युवा क्रांतीच्या माध्यमातून समाजकारणातील ' कार्यकर्ता ' म्हणून कार्य करण्याची संधी मला मिळाली, यासाठी समाजातील जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन, युवा कार्यकर्त्याची समर्थ साथ व समाजाने दिलेला प्रतिसाद..मी स्वतःला भाग्यवंत समजतो.
 मुळातच माझे वय व समाजकारणातील अल्पसा अनुभव पाहता माझ्याकडून "मार्गदर्शन " व्हावे एवढी ऐपत निश्चितच माझी नाही पण " समाजकार्याची जाणीव, कार्याची प्रेरणा व त्यातून विचारांची निर्मिती " यामुळेच आपणासी ऋणानुबंध घट्ट झाले व त्यायोगे सुसंवाद साधण्याचा माझा प्रयत्न असतो.
 " कार्य म्हणजे भाग्य व नीती म्हणजे माणुस " या सिद्धांताप्रमाणे समाज कार्याला जोडण्याचा प्रयत्न केल्यास निश्चित " समाजजीवनाची खरी दिशा " मिळू शकते.
 स्वतःच्या समाजाप्रती प्रत्येकाच्या मनातच स्वाभिमानाची भावना निश्चितच असते, परंतु समाजकार्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा व्यक्तिगत आपणच ठरवतो. बरेचदा आपले व्यक्तिगत अनुभव,व सामाजिक विषयावरची निष्क्रियता या मुळे निराशात्मक किंवा नकारार्थक निकष लावून आपण सहजच बोलून जातो.
 जन्मजात कालाधिष्टित गुण, पारंपरिक धार्मिकता व त्या अनुषंगाने आलेली प्रामाणिकता आपल्या समाजात आहेच. समाजाने शैक्षणिक प्रगतीने आपला ठसा उमटविला आहे, तर शहरी व ग्रामीण भागात आजही समाजाच्या विविध समश्येची उकल होणे बाकी आहे. मुळातच आपला समाज हा इत्तर समाजासह "समायोजन" या तत्वात गाव गाड्याचा घटक म्हणून राहिला, पण स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात व संघटित न्याय व हक्क मिळविण्यात उपेक्षित व उदासीन राहिला. बदलत्या परिस्थिनुसार आपल्या मेहनतीने व कर्तृत्वाने काही अंशी झालेली आजची प्रगती, व समाजासमोरील आव्हाने लक्ष्यात घेता बदलत्या काळानुसार सामाजिक जाणिवेतून " दिशादर्शक व कृतिशील सामाजिक चळवळ " उभी राहणे हि पांचाळ समाजाची नितांत गरज आहे.
 "संघटन शक्ती कलयुगे" या उक्तीप्रमाणे आज महाराष्ट्रात अनेक समाजाने सामाजिक संघटना उभ्या केल्या व त्या समाजाच्या ज्वलंत विषयावर प्रखरतेने सामाजिक चळवळीला दिशा दिली.त्याची दखल म्हणून, सरकार दरबारी न्याय व हक्कही मिळविला. या सर्व घटनांचे अवलोकन केल्यास एक सत्य स्पष्ट होते ते कि " समाजजीवनाचे भान, सामाजिक जबाबदारीची जाण व काळाचे ज्ञान " राखून आजच्या घडीला " श्री विश्वकर्मीय पांचाळ सुतार समाज " एकत्र येणे व सामाजिक चळवळीला दिशा दर्शक व कृतिशील करने हे सामाजिक आव्हान आहे.
 "आपला समाज हीच एक आदर्श संघटना आहे व आपण जन्मतः या जात संघटनेचे आजन्म सभासद आहोत. गरज आहे ते प्रत्येकाने आपापल्या परीने समाजऋण म्हणून योगदान देण्याची" संघटनात्मक समाजकार्याचा आढावा घेतल्यास एकसंघ पांचाळ सुतार समाजाचे संघटन असणारी लोकाभिमुख संघटनाव समाजाचे सक्षम नेतृत्वअसणे हि काळाची गरज आहे.
 संघटना या समाजाच्या असाव्यात.व्यक्तिभिमुख संघटना चा गदारोळ म्हणजे गटबाजी व निरर्थक व्यक्तिवाद, आप आपसातील हेवे-दावे व संघटनावाद आला. त्यामुळे आधीच अल्पसंख्याक व गावोगावी विखुरलेल्या समाजात दुफळी निर्माण होऊन दुरावा तयार होऊ शकतो.
 समाजाची सद्दयस्थिती जाणून समाजकार्याला दिशा द्यायची असेल तर समाजाच्या विविध समस्या व न्याय-हक्कासाठी एकत्र येऊन संघर्ष करणे जरुरी आहे. काही समस्या या परिस्थीला जोडून आल्या आहेत व बहुतांश समस्या या केवळ समाज एकसंघ नसल्या कारणाने आहेत. त्या मुळे परंपरागत सांस्कृतिक समतोल ढासळून अराजकता हि निर्माण होण्याची भीती आहे.
 आजच्या स्थितीला स्वयंरोजगार, कारागीर बांधवाना आर्थिक पाठबळ, दुर्बल घटकासाठी शैक्षणिक व आरोग्यविषयक मदत व सर्वच स्तरावर विवाह विषयक अनुरूप स्थळ व हुंडा व खर्चिक अनिष्ठ रूढी परंपरा यांचेवर समाजाचे प्रबोधन होणे हि गरज आहे.
 आजही विश्वकर्मीय पांचाळ समूह जाती, पोटजाती-उपजाती यांचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण केल्यास समाजास स्वतंत्र आरक्षणाचा दर्जा मिळून देण्याचे निकष पूर्ण होऊ शकतात. भविष्यात या विषयावर व्यापक समाज चळवळ उभी करणार आहोत.
 " वाट दिसू देगा देवा, गाठ सुटू दे !" या प्रमाणे पांचाळ समाजातील " सुमती व सूत्रधार " असणाऱ्या विश्वकर्मीय पांचाळ सुतार समाजास संपर्कातून व सामाजिक उपक्रमातून एकत्र यावे लागेल. जेंव्हा समाज आपला आहे तर सामाजिक जबाबदारी हि आपलीच आहे. कोणी बाहेरचा व्यक्ती येऊन आपल्या समाजासाठी काही करणार नाही. केवळ निष्क्रिय प्रतिक्रिया किंवा मनात न्यूनगंड बाळगून काहीच होणार नाही. समाजातील सर्वचजन " सामाजिक कार्यकर्ते " व्हावेत हि अपेक्षा नाही पण समाजघटक म्हणून समाजभिमुख कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहून समाजकार्यात सहभागी होऊ शकतो.नवोदित समाजबांधवाच्या सामाजिक कर्तृत्वातूनच समर्थ नेतृत्व उभे राहील.
 आजच्या व्यस्त जीवनात वेळेचा अभाव प्रत्येकाकडेच आहे. पण समाजकार्यासाठी वेळेचे कारण हे नक्कीच असू शकत नाही. माणूस हा सामाजिक सजीव आहे, सुख:दुःख, समारंभ व मित्र मंडळीसाठी वेळ काढतोच. मग समाजासाठी वेळ नाही का ? उदर्निवाह नंतर भौतिक सुखासाठी आपली चढाओढ असते व त्या अनुषंगाने जीवतोड धावपळ करतो. सर्व आर्थिक सुबत्ता व स्थिरता आल्यानंतर हि समाजात मान-सन्मान असावाच लागतो. काही जण आत्मिक समाधानासाठी अध्यात्माची वाट धरतात. माझ्या मते, अध्यात्माचा परमोच्च अर्थ जर विश्वकल्याणासाठी " पसायदान " असेल तर समाजकार्यात हि अध्यात्मिक समाधान पर्याप्त स्वरूपात मिळणारच.
 शेवटी व्यक्तीसापेक्ष कुटुंब, कुटुंबसापेक्ष समाज व समाज सापेक्ष राष्ट्र निर्मिती होत असेल तर कौटुंबिक भावनेप्रमाणे समाजासाठी कार्याची प्रेरणा मिळू शकते.
 आपण जन्म घेतलेल्या समाजातूनच आपल्याला स्वतःची विशिष्ट ओळख व त्याच समाजाच्या संस्कृतीचा परिवार,नातीगोती व आप्तेष्ट व मान-सन्मानही मिळतो त्या समाजाचे समाजऋण फेडण्याची जाणीव हि आपल्यात असणे हि माणूसपणाचे लक्षण आहे.
 " ईश्वरे दिली काया तिचे सार्थक करावे, स्वधर्म कार्यासाठी अखंड झिजावे !" अपेक्षा एवढीच आहे या "सोशियल मीडियाच्या " माध्यमातून का होईना आपण एकत्र आलो आहोत, यातून सामाजिक सुसंवाद घडावा. त्यातून " प्रत्येक जिवंत विचाराने ज्वलंत होऊन " काळानुरूप सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी व देव,धर्म,न्याय,हक्क मिळविण्यासाठी पारिवारिक भावनेने समाज एकसंघ व्हावा. समाजातील दुर्बल,वंचित घटक हि सामाजिक प्रगतीच्या प्रवाहात सुखाने नांदावेत.
 आपणास वेळ मिळाल्यास प्रतिक्रिया आवश्य पाठवाव्यात, व मांडलेल्या विचारांचे महत्व वाटत असल्यास आपल्या संपर्कातील सामाजिक ग्रुप व समाजबांधवांकडे प्रसारित करावा. " कंकण करी बांधियेलें, जनसेवे जीवन दिधले " या प्रमाणे आम्ही कार्यकर्ते कार्य करू पण या साठी आपला प्रतिसाद हीच प्रेरणा आहे.
🙏🏻 आपलाच, 🙏🏻
सदैव समाज ऋणात,
श्री बाळासाहेब ना.पांचाळ
कार्यसेवक,
श्री विश्वकर्मा युवा क्रांती संघ 
📱9527780099
tweet : @Balasaheb_Panchal